पाकिस्तानी नागरिक परतीच्या मार्गावर   

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध आपली राजनैतिक आणि धोरणात्मक भूमिका कठोर केली आहे. भारताने पाकिस्तानच्या नागरिकांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतर अनेक पाकिस्तानी नागरिक घाईघाईने देश सोडून जात आहेत. 
 
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानच्या संशयित सहभागाबद्दल विचारले असता, त्या व्यक्तीने फार बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला, हल्ल्याचा कट कोणी रचला हे कोणीही सांगू शकत नाही. बुधवारी, परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानला राजनैतिकदृष्ट्या वेगळे करण्याच्या उद्देशाने व्यापक उपाययोजनांची घोषणा केली. यामध्ये अटारी-वाघा सीमा तात्काळ बंद करणे आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क व्हिसा सूट योजना स्थगित करणे यासारख्या गोष्टींचा समावेश यात आहे. 
 
या योजनेअंतर्गत जारी केलेले सर्व विद्यमान व्हिसा रद्द करण्यात आले असून, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. अलीकडेच भारतात प्रवेश केलेल्या वैध प्रवास कागदपत्रांसह सर्व पाकिस्तानी नागरिकांना १ मे २०२५ पर्यंत पाकिस्तानात परतावे लागेल, असे निर्देश अधिकार्‍यांनी दिले आहेत. व्यापार आणि नागरिकांमधील संपर्कासाठी एक महत्त्वाचा मार्ग असलेली सीमा बंद केल्याने द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, असे याने नमूद केले.

सीमा बंद करणे चुकीचे...

याबाबत माध्यमांशी बोलताना एक पाकिस्तानी पर्यटक म्हणाला, अटारी-वाघा सीमा बंद करण्याच्या भारताचा निर्णय निराशाजनक आहे. आम्ही भारतात  एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलो होतो. आमच्याकडे ४५ दिवसांचा व्हिसा होता, पण या परिस्थितीत आम्हाला भारत सोडावा लागत आहे. आम्ही १५ एप्रिल रोजी येथे आलो होतो. मात्र, सीमा बंद करणे हे चुकीचे पाऊल आहे. दोन्ही देशांमध्ये बंधुता असली पाहिजे. पण जे काही घडत आहे ते चुकीचे आहे.

पाकिस्तानची धमकी

इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज खान यांनी गुरूवारी मंत्री गटाची आणि तिन्ही सेना प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत भारताशी संबंधित काही निर्णय घेण्यात आले.या बैठकीनंतर भारताबरोबर झालेले सर्व द्वीपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार आम्ही वापरू शकतो, असे पाकिस्तानने सांगितले. यात सिमला कराराचाही उल्लेख करण्यात आला आहे.
 
पहलगाममधील नरसंहारानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला. यासोबतच, पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आणि अटारी सीमा बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पाकिस्तान बिथरला असून सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा आम्ही तीव्र विरोध करतो, असे पाकिस्तानने म्हटले आहे. सिंधू पाणी करारानुसार पाकिस्तानात वाहणार्‍या पाण्याचा प्रवाह रोखणे किंवा वळविण्याचा प्रयत्न करणे हे युद्धाला चिथावणी दिल्याचे कृत्य समजले जाईल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.भारताच्या मालकीच्या किंवा भारताकडून संचालित केल्या जाणार्‍या विमान वाहतुकीला पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात बंदी घातली जात आहे. 
 

Related Articles